महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री :सुनेत्रा पवार यांनी उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.... सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, 'वित्त' मुख्यमंत्र्यांकडे

 सुनेत्रा पवार यांनी  उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली....

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, 'वित्त' मुख्यमंत्र्यांकडे




पहिल्या महिला उपमुख्यमंत्री : साध्या पद्धतीने 'लोकभवन'वर पार पडला १२ मिनिटांचा शपथविधी सोहळा; शरद पवार यांची अनुपस्थिती, उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्यांचा कार्यभार, मुख्यमंत्री सादर करणार आगामी अर्थसंकल्प


मुंबई:  अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रि- पदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी शनिवारी 31/01/2026 रोजी लोक भवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर पक्ष आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पक्षावर नियंत्रण 'ठेवणे, निर्माण झालेल्या संकटातून पक्षाला बाहेर काढणे व संघटनात्मक स्थैर्य राखणे, ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची परवानगी घेतली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे नाव शपथ घेण्यासाठी नाव पुकारले. त्या व्यासपीठावर गेल्या. त्यांनी 'गांभीर्यपूर्वक' शपथ घेतली. यावेळी कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत

सुनेत्रा पवार शपथ घेण्यासाठी जाताना व शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपस्थित आमदारांनी 'अमर रहे अमर रहे अजित पवार अमर रहे', ' एकच वादा अजित दादा' अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित भावनिक झाले होते

अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत 'शिव-शाहू-फुले-आंबेडकर' यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


ह्या शपथ विधी बद्दल मा.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सुनेत्रा पवार यांना सांत्वन पर  खालील प्रमाणे सदिच्छा दिल्या...


महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल सुनेत्रा पवार यांना मी शुभेच्छा देतो. त्या महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे 'व्हिजन' पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान


"ज्या धिरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. महाराष्ट्रासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील असा ठाम विश्वास आहे.


देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.



शपथविधीबाबत कुठलीही माहिती नव्हती शरद पवार

बारामती : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या

शपथविधीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे राष्ट्रवादी (शरद पवार) चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. गोविंदबाग निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या विषयावर सध्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले. शरद पवार म्हणाले, की 'शपथविधीबाबत कदाचित, मुंबईत कुठेतरी चर्चा झाली असेल. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.'

 सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रि-पदाच्या शपथविधीबाबत

माहिती नसल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर गोविंदबाग निवासस्थानी पार्थ पवार यांनी भेट देत संपूर्ण पवार कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली. चर्चेतील निर्णयाबाबत 'सस्पेन्स' कायम होता.


विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त व दिवंगत अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी चर्चेचा खुलासा केला. 'अजितदादां'ची शेवटची इच्छा संपूर्ण पवार कुटुंब पूर्ण करतील, याबाबत संकारात्मक निर्णय झाल्याचे गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


गुजर म्हणाले, "सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत 'साहेबां'नी वक्तव्य केल्यावर कुटुंबात काहीसा कम्युनिकेशन गॅप असल्याचे जाणवले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. पवार कुटुंबाने मला आपले मानले असून या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. गोविंदबाग येथे पार्थ पवार तसेच कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर कोणतेही गैरसमज राहिलेले नाहीत."


पार्थ पवार शपथविधीला उपस्थित नसून ते बारामतीतील 'सहयोग' निवासस्थानी नागरिकांच्या भेटी घेत आहेत. आज पुन्हा 'सहयोग' येथे चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पक्का झाल्याचे गुजर यांनी सांगितले. "अजितदादांच्या इच्छेनुसार दोन्ही पक्ष एकत्र येतील. ही प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागेल. याबाबतची अधिकृत घोषणा पक्षाच्या नेतृत्वाकडून करण्यात येईल," असेही त्यांनी यावेळी सांगितले.


गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, युगैंद्र पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर पार्थ पवार, युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार बाहेर पडले; मात्र त्यांनी माध्यमांना कोणतीही माहिती दिली नव्हती



अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र


गुजर यांनी पुढे सांगितले की, विद्या प्रतिष्ठानमध्ये दिवंगत अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासह विविध विषयांवर 'साहेबां'बरोबर चर्चा झाली आहे. "सगळेजण अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र आहेत.


दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून ही अजितदादांची अखेरची इच्छा होती," असे त्यांनी स्पष्ट केले.

१२ तारखेला होणार होती विलीनीकरणाची घोषणा

राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. विलीनीकरणाची घोषणा १२ तारखेला होणार होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडला.

या चर्चामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नव्हतो. अजितदादा, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सातत्याने यात होते. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र काम करण्याबाबत एकमत होते. दादांची इच्छा होती की, पक्ष एकत्र यावेत. ती इच्छा पूर्ण व्हावी, ही आमचीही इच्छा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई का होत आहे आणि यामागे कोणाचा हात आहे? या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले.



राष्ट्रवादीकडे वित्त खाते नाही; ही पहिलीच वेळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ ही खाती सोपविण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त खाते मात्र त्यांना मिळाले नाही. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून तेच आगामी अर्थसंकल्प सादर करतील.


मुंबई  महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत

आहे पण या पक्षाकडे वित्त खाते नाही अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्तखाते न दिल्यामुळे यावेळी राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील.



विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड


उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विधानभवनात अजित पवार ज्या दालनात बसायचे त्याच दालनातील हॉलमध्ये दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबतचे ठराव मांडले


राज्यसभा सदस्यत्वाचा 'राजीनामा नाही


सुनेत्रा पवार इतक्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाहीत. नियमातील तरतुदीनुसार त्या उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी विधानसभेवर निवडून येईपर्यंत राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहू शकतात. बारामती पोटनिवडणुकीतील विजयानंतर त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.



मुख्यमंत्र्यांची भेट


सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेल्या निवडीची माहिती देण्यासाठी आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून शपथविधी सोहळ्याबाबत विनंती करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि समीर भुजबळ उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना याबाबत अवगत केले आणि सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या